शक्तिदायक आहे पिस्ता !

पिस्ता हे छोटं, चविष्ट, कठीण कवचाचं पौष्टिक फळ आहे. त्याचं कवच टणक, पण दोन भागांत फुटलेलं असतं. पिस्त्याच्या गरावर शिवाय एक साल असते. त्याच्या आतील गराचा रंग हिरवट, गुलाबी किंवा पिवळा असतो.पिस्त्याचे झाड फार डौलदार दिसते. कारण त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या फुटतात व पानांनी भरून जातात.

पिस्ता मूळचा पश्चिम आशियामधील असून हजारो वर्षे पूर्वेत त्याची लागवड होत आली आहे. इराण, सीरिया, टय़ूनिशिया, पॅलेस्टाईन, मेसो पोटेमिया, तुर्कस्तान, फ्रान्स, अफगाणिस्तान व अमेरिका या ठिकाणी पिस्त्याचं पीक घेतलं जातं.

बी लावून पिस्त्याचं झाड सहज रुजवता येतं आणि ते लवकर वाढतं. इराणमध्ये व अफगाणिस्तानात पिस्ता रानावनात इतका वाढतो की, त्याची जंगलं होतात. थंडीत तिथल्या भटक्या लोकांचं ते अन्न बनतं.

पिस्ते गोड आणि पौष्टिक असतात. त्यात पाणी कमी व उरलेला भाग मूल्यवान अन्नघटकांचा असतो. पिस्त्यामध्ये प्रथिने बरीच असली तरी ती आम्ल नसून पचनक्रियेनंतर अल्कलीयुक्त बनतात. पिस्ते हे टिकाऊ आहेत. बदामाचे सर्व गुण त्यात आहेत.

अशक्तपणावर पिस्ते हे टॉनिक म्हणून उत्तम आहे.

दूध व मध एकत्र करून त्यात पिस्त्यांची पूड घालून प्यायल्यास मज्जातंतूंना ते चांगले टॉनिक आहे. याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.

हृदयाचे स्नायू मजबूत होतात व जंतूसंसर्गाचा प्रतिकार होतो.

विपुल प्रमाणात लोह असल्याने पिस्त्यामुळे रक्त वाढतं.

नियमित सेवन केल्यास अशक्तपणावर मात केली जाते.

पिस्त्याच्या गराबाहेरच्या सालीचा उलटय़ा थांबवणे, पोटदुखी घालवणे आणि बद्धकोष्ठ नाहीसा करणे यावर उपयोग होतो. पचन संस्थाही सुधारते.

पिस्त्याच्या फुलांमुळे श्वासनलिकेत जमणारा कफ दूर होतो. तसंच जुनाट खोकला, दमा, धाप, यांवर ही फुले गुणकारी ठरतात.

पिस्त्याच्या तेलाने पोटातील जंत पडून जातात.

पिस्ते आशियातील व युरोपातील देशांत खारवून मुखशुद्धी म्हणून हातांनी सोलून खातात.

महाग मिठाईत चवीसाठी व शोभेसाठी पिस्त्याचे काप काढून घालतात. आइस्क्रीम, केक, बिस्किटे यांतही पिस्ते वापरतात.

खारवलेले पिस्ते चवदार लागले तरी अन्न म्हणून ते मीठ घातल्याने आरोग्यास विघातक आहेत.

पिस्ते हे नुसतेच खाल्ले तर मात्र ते शक्तिदायक, आरोग्यदायी व पौष्टिक असतात.
थोडे नवीन जरा जुने