मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

मुंबई दि 2 : दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.

 सर्व धर्माच्या प्रमुख धर्मगुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले.

 लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

लॉकडाऊन उठविल्यानंतरचे नियोजन

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातीळ स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे, असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.

३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, भोजन

परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ , डॉक्टर नियुक्त केले आहेत असे सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनादेखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
थोडे नवीन जरा जुने