रक्ताच्या गुठळ्या वेळीच ओळखा,नाहीतर...

ज्या व्यक्तींना डीव्हीटी म्हणजेच डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरीकोज व्हेन्ससारखे किचकट आजार आहेत,किंवा होण्याची शक्यता आहे,त्या व्यक्तींनी उन्हाळ्यात आणि एरव्हीही आपल्या पायांची व आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.


उन्हाळ्याच्या दिवसांत नेमके कोणते त्रास कशामुळे उद्भवतील काही सांगता येत नाही. या दिवसांत प्रवास करणेही त्या दृष्टीने काहीसे कटकटीचे होऊ शकते. ज्या व्यक्तींना डीव्हीटी म्हणजेच डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरीकोज व्हेन्ससारखे किचकट आजार आहेत,किंवा होण्याची शक्यता आहे,त्या व्यक्तींनी उन्हाळ्यात आणि एरव्हीही आपल्या पायांची व आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

व्हेरीकोज व्हेन्स काय किंवा डीव्हीटी काय हे दोन्ही आजार पायांच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे म्हणजेच निलांचे आजार असून हे आजार असलेल्या व्यक्तींनी प्रवासाच्या काळात विशेष काळजी घेण्याची खूप गरज असते. आज आपण डीव्हीटी या अत्यंत वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या गंभीर आजाराविषयी, त्याची लक्षणे व उपचारांविषयी माहिती करून घेणार आहोत.

डीव्हीटी या आजारात पायांच्या खोलवरच्या निलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात आणि पायांना वेदना होऊ लागतात. काही वेळा त्याच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष केले गेले तर तो गंभीर स्वरुप धारण करू शकतो. पायात रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिन्यांमध्ये होते, त्या निलांचा फुफ्फुसांशी अत्यंत जवळचा संबंध असतो. फुफ्फुसाकडे रक्त शुद्धीकरणासाठी घेऊन जाण्याची भूमिका या निला पार पाडत असल्याने या पायांतील रक्तवाहिन्यांमधील गुठळी जर वरच्या बाजूला सरकली,तर त्यामुळे एखाद्या फुफ्फुसातील रक्तवाहिनीत ब्लॉक होऊन व्यक्तीला पल्मोनरी एम्बॉलिझम होण्याची शक्यता असते. म्हणजेच फुफ्फुसातली रक्तशुद्धीकरणाची क्रियाच बंद होते. त्यामुळे अचानक छातीत जड वाटणे,दम लागणे आदी लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. क्वचित त्वरीत मृत्यूही ओढवू शकतो.


हा आजार काही तासांतच बळावू शकतो. विशेषत: विमानप्रवासात किंवा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना पायांची हालचाल फारच कमी वेळा होते. तासनतास एकाच जागी बसल्याने डीव्हीटी आजाराला आपण आमंत्रण देत असतो. एकाच शारीरिक अवस्थेत बराच काळ बसल्यामुळे पायांच्या निला शिथील पडतात व त्यांत रक्ताच्या गुठळ्या होतात. बरयाचदा आपण ऐकतो की, एखादी व्यक्ती चांगली धडधाकट होती परंतु, अचानक तिचा मृत्यू झाला तर,बरयाचदा दीर्घकाळाच्या प्रवासात पायातील रक्ताच्या गुठळ्या वरच्या बाजूला सरकल्याने पल्मोनरी एम्बॉलिझम होते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.


कोणत्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते :


हा आजार विशेषत: लठ्ठ व्यक्तींमध्ये किंवा शारीरिक हालचालींचा अभाव असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. वाढत्या वयाचा आणि या आजाराचा जवळचा संबंध असला तरी केवळ ज्येष्ठ व्यक्तींनाच हा आजार उद्भवतो असे नव्हे, तर तरुणांमध्येही आजकाल डीव्हीटीचे प्रमाण वाढताना दिसते. ज्या व्यक्तींच्या रक्तात रक्त पातळ ठेवणारया घटकाची अनियमित पातळी असते, अशा व्यक्तींच्या शरिरात कोणत्याही भागात कधीही रक्ताची गुठळी किंवा गाठ होऊ शकते.

गरोदरपणातही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच, ज्या महिला ओरल कॉण्ट्रासेप्टिव्ह्स घेतात, त्यांच्यातही डीव्हीटीचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. कोणत्याही ऑपरेशननंतर किंवा उपचारांनंतर डीव्हीटी होण्याची शक्यता असते.


उन्हाळ्याचा या आजाराशी नेमका काय संबंध :


उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश लोक विमानाने किंवा रेल्वेच्या एसी क्लासमधून प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे डीव्हीटीच्या बाबतीत इकॉनॉमी क्लास सिण्ड्रोम हा आजार बळवण्याची शक्यता असते. वर म्हटल्याप्रमाणेच, तासनतास विमानात एकाच जागी बसल्याने पायाच्या निलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात आणि या गुठळ्या शरिराच्या वरच्या भागांत जाऊन फुफ्फुसांत जाऊन अडकतात.


प्रतिबंध व उपचार :


डीव्हीटी किंवा व्हेरीकोज व्हेन्सचे आजार बळावू नयेत यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे, प्रवास करताना पायांची जास्तीत जास्त हालचाल करीत राहणे, पोटरीचे व्यायाम, घोट्याचे व्यायाम, स्वत:च्या गाडीने प्रवास करीत असताना, दर एक-दोन तासांनी ब्रेक घेणे हे काही महत्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. रेल्वे प्रवासामध्ये ही सोय फारच सोपी असते, कधीही उठून चालू शकू इतकी जागा आणि वेळ आपल्याकडे असतो. विमानातसुद्धा एका जागी न बसता मध्येच उठून चालणे गरजेचे असते. फुकट दारू मिळते म्हणून दारु पिऊन पडून राहणा-या व्यक्तींच्या शारीरिक हालचाली होत नाहीत. हे टाळणे अत्यावश्यक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे रक्ताचा पात्तळपणा टिकून राहतो. एका जागी बसल्या-बसल्यादेखील पायाचे व्यायाम करणे गरजेचे असते. पूर्वी ज्या व्यक्तींना हा आजार झाला असेल,त्यांच्या बाबतीत या आजाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. रक्त पातळ राहण्याचे औषध किंवा इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असते. लांब प्रवासाला जाताना या आजाराच्या रुग्णांनी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते.


हा आजार बळावू नये म्हणून इतर वेळीही व्यायाम करणे आवश्यक असते. डीव्हीटीच्या रुग्णांना प्रोफिलॅक्सीसची औषधे दिली जातात. काही वेळा पायाला काफ पंप लावून पायांतील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यास मदत दिली जाते. आजकाल खास प्रकारचे मोजेही मिळतात, ज्यांच्यामुळे पायांवर ठराविक कालावधीने दबाव पडतो व रक्ताभिसरण सुरळीत राहते. ज्या व्यक्तींच्या रक्तातच काही घटकांच्या कमतरतेमुळे हा आजार होण्याची शक्यता असते, त्यांची थ्रॉम्बोफिलिया टेस्ट करून घेण्यात येते. तसेच डॉपलर अल्ट्रासाऊंडसारख्या आधुनिक सोनोग्राफी तंत्रज्ञानातूनही डीव्हीटी आजाराचे निदान करता येते.

डीव्हीटीची असलेल्या रुग्णांना इंजेक्शन्स आणि गोळ्यांच्या माध्मयातून रक्त पातळ रण्यासाठी उपचार दिले जातात. जर एखाद्या रुग्णाच्या मोठ्या व्हेनमध्ये गुठळी झाली आणि तो पावलापासून वर जांघेतल्या नसा, पोटातल्या व्हेन्समध्ये जाऊन अडकला तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टच्या मदतीने अशा वेळी एक विशिष्ट कॅथेटर रक्तवाहिनीत घालून ती गाठ काढून टाकावी लागते. ही एकप्रकारची छोटी शस्त्रक्रियाच असते. ब-याचदा रक्त पातळ करणा-या औषधांचा वापर करून गाठी विरघळवल्या जातात.


या एलएमडबल्यूएच औषधांची इंजेक्शन्स ब-याचदा पोटाच्या त्वचेखाली घ्यावी लागतात. रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्या घेत असता वरचेवर रक्ताची तपासणी करावी लागते. आता मात्र नवीन प्रकारची औषधे उपलब्ध असल्याने सतत रक्ततपासणी करण्याची गरज भासत नाही. हे औषधोपचार सर्वसाधारणपणे सहा महिने चालू ठेवणे आवश्यक असते. डीव्हीटी झाला तर पायाला अजिबात मालीश करू नये. मालीशमुळे पायातली गुठळी आपणच आपल्या हातांनी वर ढकलू शकतो व त्यामुळे नसलेली समस्या आपणच आपल्याच हातांनी तयार करत असतो.


आजकाल हा आजार लक्षात येण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांमध्ये व लोकांमध्ये डीव्हीटीविषयीची जागरुकता वाढली आहे, ही जमेची बाजू आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
थोडे नवीन जरा जुने