रात्री उशिरा झोपण्याची सवय म्हणजे मधुमेहाला आमंत्रण...मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा तो असलेल्या लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो. मधुमेही लोकांना झोप लवकर लागत नाही. रात्री उशिरापर्यंत ते जागत बसतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि मग त्यांची प्रचंड चीडचीड होते. या सगळ्याची परिणती रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढण्यात होते. रात्री उशिरा झोपण्याची सवयही टाईप 2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते.

आतापर्यंत मधुमेह होण्यास फक्त लठ्ठपणा कारणीभूत आहे असं मानलं जायचं, पण मधुमेह होण्यापाठी कितीतरी कारणं असतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते. तुम्ही जितके कमी तास झोपाल, खाण्याची इच्छा तितकीच जास्त होईल. तुम्ही थकलेले असता तेव्हा तुमचे शरीर भुकेची भावना करून देणारे हार्मोन स्र्वते, त्यामुळे अधिक खावंसं वाटतं. परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कबरेदकांचं सेवन केलं जातं. दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणा-या व्यक्तींना दररोज ७ ते ८ तास झोप घेणा-या व्यक्तींपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या लोकांमध्ये ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, त्यांनाही मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

मधुमेही लोकांना झोपेचा त्रास असतो. मधुमेही लोकांपैकी किमान अध्र्याहून अधिक लोकांना रात्री झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्र्वत नाही. त्यामुळे तुम्हाला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणा-या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि तात्पर्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.

पुरेशी झोप न मिळण्याने ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे त्यांना हा धोका आणखीनच वाढतो. सलग काही रात्री झोप मिळाली नाही तर या व्यक्तींच्या जीवावरही बेतू शकतं. मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेही लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो असे पुराव्याने सिद्ध झालेले आहे. एक-दोन दिवस पुरेशी झोप झाली नाही, तर ती झोप नंतर भरून काढता येते; पण झोप न लागण्याचा त्रास कायम राहिला तर मात्र त्यातून सावरणे अवघड होऊन बसते. जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, झोप भरून काढणं तितकंच अशक्य होत जाईल. असं झाल्यास तुमचं शरीर पुरेशी झोप न मिळण्यालाच सरावून जाईल आणि त्याची परिणती तुमचा मधुमेह वाढण्यात होईल.

बहुतेक लोकांना रात्री सात ते नऊ तासांच्या झोपेची गरज असते, तरीही भारतीय लोक सहा तासांहून कमी झोप घेतात असे अभ्यासातून दिसून आले आहे. या समस्येवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घ्या. ठरावीक वेळी झोपा आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावा. त्यामुळे तुमचे शरीरही या वेळापत्रकाला सरावेल आणि तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री उशिरापर्यंत जागू नका, पुरेशी झोप घ्या, आरोग्यदायी आहार घ्या आणि व्यायाम करणे सोडू नका!

पुरेशा झोपेसाठी

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. वैज्ञानिकांच्या मतानुसार झोपेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन होतात. त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो. पुरेशी झोप मिळाली नाही तर दुस-या दिवशी थकवा जाणवतो. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे झोप वयानुसार कमी-जास्त होत असते. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.

सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्तीला सहा ते आठ तास झोप आवश्यक असते.

झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित करावी.

झोपण्याचं ठिकाण शांत असावं. तसंच काही जणांना खोलीत लाईट लावायची आवड असते त्या दिव्याचा प्रकाश हलका असावा.

डोक्याखाली घेतली जाणारी उशी व्यवस्थित असावी. त्याचा जोर आपल्या डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

रात्रीच्या जेवणात चांगला सकस आहार घेतलात तर झोप चांगली येईल. त्यात तांदूळ, बटाटा आणि मुळं असलेल्या भाज्यांचा समावेश करावा.

झोपण्यापूर्वी अतिरिक्त म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये.

दिवसा नियमित व्यायाम करावा, म्हणजे रात्री चांगली झोप येईल.

झोपण्यापूर्वी मनातील चिंता, काळजी दूर करा.
थोडे नवीन जरा जुने