बैठय़ा जीवनशैलीमुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो हा त्रास टाळण्यासाठी हे करा....


केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा आजकाल त्यांचा टॅबलेट किंवा स्मार्टफोन वापरताना पोक काढून बसतात. ३० ते ५० या वयोगटातील ६०% हून अधिक प्रौढ व्यक्ती त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चिकटून असतात. कामाच्या ठिकाणी असलेल्या बैठय़ा जीवनशैलीमुळे गेल्या पाच वर्षांत पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.
जे दीर्घकाळ बसून असतात, त्यांनी दर तासाला थोडा वेळ फेरफटका मारून यावा आणि दर दोन तासांनी खालील स्ट्रेचिंग व्यायाम करावेत.

१) तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या खाली वाका आणि तुमच्या पायांना स्पर्श करा. हा वाकण्याचा व्यायाम उभं राहूनही करता येईल.

२) तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या तुमचा डावा हात बॅकरेस्टच्या उजव्या कोप-याला लावा. त्याचप्रमाणे उजवा हात बॅकरेस्टच्या डाव्या कोप-याला लावा, जेणेकरून तुमच्या शरीराचा वरचा भाग लवचिक होईल.

३) उभे राहून तुमच्या कुल्ह्यांवर हात ठेवा आणि तुमचा शरीराचा वरचा भाग मागील बाजूस वाकवा; या व्यायामामुळे तुमच्या पाठीचा कणा आणि स्नायू स्ट्रेच होतील.

४) कुल्ह्यांवर हात ठेवून उभे राहा आणि दोन्ही बाजूंना वाका.

५) त्याचप्रमाणे बोटे दुमडून मुठ तयार करा आणि पुन्हा त्या बोटांना स्ट्रेच करा.

६) घरी असताना जमिनीवर झोपून करायचे व्यायामही करू शकता. पाठीवर झोपून तुमचे गुडघे छातीच्या बाजूला आणा.

स्नायूंना व्यायाम देण्यासाठी नियमित अ‍ॅक्टिव्हिटी अत्यावश्यक आहे. स्नायूंमध्ये एखादी समस्या निर्माण झाली असल्यास, शरीराला योग्य विश्रांती मिळाली तर ती समस्या लवकर बरी होईल. पण सतत वेदना होत असेल तर कॅल्शिअमयुक्त आहार वाढवावा आणि पोषक आहारावर भर द्यावा. जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल किंवा पाठीच्या कण्याला ताठरपणा आला असेल तर खालील सोपे उपाय लक्षात ठेवा.

१) व्यायाम करताना पोटाचे व्यायाम टाळा कारण त्यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो.

२) दैनंदिन क्रिया सुरू ठेवा पण अवजड व्यायामप्रकार करू नका. जिथे वेदना होत आहे, तेथे बर्फ लावू शकतात. पण त्यात २० मिनिटांचा कालावधी असू द्या.

३) सौम्य स्ट्रेचिंग व्यायाम करा, जे स्नायूंना शिथिल करतील आणि इतर स्नायूंना बळकट करतील. पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा.

४) महिन्यातून एकदा पाठीला मसाज करा, गरम पाण्याने स्नान करा.
थोडे नवीन जरा जुने