तोल सांभाळणारा ताठ कणा!!


संपूर्ण शरीराचा तोल पाठीचा कणा सांभाळतो. मात्र आपण त्याची हवी तशी काळजी घेत नाही. त्यामुळे मणक्याच्या दुखण्याला नकळत आमंत्रण देत असतो. शरीराचा तोल सांभाळणा-या या कण्याची अर्थात मणक्याची कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊ.
मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठीचा कणा होय. आपल्या संपूर्ण शरीराला तोलून धरणारा हा अवयव. मात्र त्याची कळत नकळत बरीच हेळसांड आपण करत असतो. वेडेवाकडे बसणे, बराच वेळ संगणकासमोर अवघडून बसणे, सतत पोटावर झोपणे, मऊ गाद्यांवर झोपणे, जमिनीवरील वस्तू उचलण्याकरता कंबरेतून वाकणे यांसारख्या कित्येक क्रियांद्वारे आपण मणक्याच्या दुखापतींना आमंत्रण देत असतो.

मणक्यांची काळजी कशी घ्याल?

» वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे. ‘ताठ बस’ हे शाळेपासून ऐकत आलेले आणि कधीही प्रत्यक्षात न उतरवलेले वाक्य आचरणात आणण्यास सुरुवात करावी.

» सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास; दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन चक्क आळस दिल्याप्रमाणे आपले हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.

» मऊ मॅट्रेसचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरू करावे.

» खुर्चीत बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहे ना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी.

» रोज तिळाचे तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.

मणक्याच्या दुखण्यावर इलाज

» सकाळच्या वेळी पाठीवर आडवे पडून आपले दोन्ही पाय सायकिलग केल्याप्रमाणे हलवावेत. किंवा एक एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश

» हा आकडा रेखाटावा. असे केल्याने कंबरेचे स्नायू मोकळे होऊन मणक्यावरील त्यांचा ताण कमी होतो.

» आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती, कटीबस्ती, षष्टीशाली पिण्डस्वेद, तैलधारा या वा तत्सम अन्य क्रिया आणि पोटातून घेण्याची आयुर्वेदीय औषधे घेण्यास सुरुवात करावी.

» आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा. तसेच आंबवलेले पदार्थ आणि एकंदरीतच वातूळ असलेले पदार्थ खाणे टाळावे.

» आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने या त्रासावर उपयुक्त योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.

» मणक्यांच्या त्रासांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पेनकिलर आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे वेळीच लक्षात घ्या. आपल्या मणक्यांची काळजी घ्या. आयुष्यभर ताठ पाठ कण्याने जगा!!

» पाठीच्या मणक्याच्या आजारांवर योगासनांच्या माहितीसाठी पुढील संकेतस्थळाचा आधार घ्या.
थोडे नवीन जरा जुने