पौष्टिक सोयाबीन


तेल आणि प्रथिने असलेलं हे फार जुनं पीक आहे. सोयाबीन हे वर्षायु झुडुप असून त्याच्या वेलीला आधार लागतो. झुपक्यांनी काळपट शेंगा लागतात. आतील बिया गोलसर, पिवळय़ा, हिरवट, तपकिरी किंवा काळय़ा रंगांच्या असतात. सोया हे नाव चिनी प्रदेशातून आले आहे. मध्य आशियातील लोक मृतांना सोयाबीनचे दाणे व मध अर्पण करीत असत.

उत्तम प्रथिनांमुळे सिंधू खो-यात ऋषिमुनी शाकाहारी जेवणात सोयाबीनचा वापर करायचे. हे मूळचे चीनमधील पीक असून चीन, मंच्युरिया, कोरिया येथे प्राचीन काळापासून हे पीक उपलब्ध आहे. ख्रिस्तपूर्व १८३८ पासून त्यांचा चिनी साहित्यात उल्लेख आढळतो.

आज जगभर हे पीक लोकप्रिय असून अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, रशिया, ऑस्ट्रेलिया येथे त्याचं विशेष पीक घेतलं जातं. हल्ली ब्राझील, मेक्सिको, रुमानिया, अर्जेटिना व भारतातही सोयाबीनचं पीक घेतलं जातं. यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व इतर अन्नघटक मुबलक आहेत. सोयाबीनमधील प्रथिनक ही संपूर्ण असून त्यात आवश्यक ती अमिनो अ‍ॅसिडस् असतात. माणसाच्या शरीरबांधणीस आवश्यक ते सारे घटक सोयाबीनमध्ये मिळतात. सोयाबीनमध्ये दूध, अंडी व मांस यांच्याहून अधिक प्रथिने आहेत.

याच्या सेवनामुळे शरीर मांसल बनते, कांती सुधारते.

शरीराची वाढ कार्यक्षमतेने होते. तसेच मलावरोध होत नाहीत.

सोयाबीनचे दूधही अनेक आजारांवर उपयोगी होते.

लहान मुलांना सोयाबीनचं दूध देताना गाईच्या दुधात मिसळून द्यावे. यामध्ये ९० टक्के प्रथिने शरीरात सोडली जातात व संपूर्ण दूध पचवले जाते.

अपचन, वयोपरत्वे येणारा थकवा, मंदपणा यावर हे उत्तम आहे.

सोयाबीनमधला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लेसिथिन. याचा एक थर आतडय़ावर आतून येत असल्यामुळे अल्सर होत नाही.

 अवयवांत साठणारे कोलेस्ट्रोल व मेद काढून इतरत्र नेण्याचे काम सोयाबीन करते.

 सोयाबीनमध्ये पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पिष्टमय पदार्थामुळे उष्णता व उत्साह निर्माण होतो आणि मूत्रात जाणारे साखरेचे प्रमाण कमी होते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींना सोयाबीन खूप उपयोगी आहे.

सोयाबीनमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने ते रक्ताक्षयावरही उपयोगी आहे.

सोयाबीनचे दूध, दही, पीठ, दाणे, तेल यांचाही वापर होतो. पाश्चात्य राष्ट्रांत सोयापिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

 सोयाबीनचे पीठ, गव्हाच्या पिठापेक्षा अधिक पौष्टिक मानले जाते. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, थायमिन, रिबोफ्लेविन असते.

त्वचेच्या व्याधींवर सोयाबीन अतिशय गुणकारी आहे.

 मांस, अंडी, दूध यातील प्रथिनांच्या अनावश्यक वापराला यामुळे पायबंद बसतो.

शरीराच्या पाचक एंझाइम ट्रिप्सीम याच्या कार्याला सोयाबीनमुळे अटकाव होतो. सोयाबीन भाजून घेतल्यास हा अटकाव होत नाही.
थोडे नवीन जरा जुने