मधुमेहात व्यायामाचे महत्त्व


टाईप १ मधुमेहाला इन्सुलिनवर अवलंबून असलेला मधुमेह किंवा ज्युवेनाइल मधुमेह म्हणतात. हा मधुमेह कमी वयात मुलांवर परिणाम करतो. या विकारात स्वादुिपडातील बिटा पेशी नष्ट होतात आणि रुग्णाला इन्सुलिन बाहेरून घ्यावे लागते.टाईप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी राहणीमानाच्या शैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सेवन केल्या जाणा-या कॅलरींच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम आणि वजन कमी करणे यामुळे टाईप १ मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये कमालीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

व्यायामामुळे तुमच्या शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. टाईप १ मधुमेह असलेल्या रुग्णांना व्यायामामुळे फायदा होतो कारण त्याने तुमची इन्सुलिनच्या प्रति असलेली संवेदनशीलता वाढते.

दुस-या शब्दात सांगायचे म्हणजे, व्यायामानंतर तुमच्या शरीराला कबरेदकांवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त इन्सुलिन लागत नाही. तुमच्या मुलाला जर टाईप १ मधुमेह असेल तर त्याला किंवा तिला पुरेसा व्यायाम करायला सांगा. हे मधुमेह व्यवस्थापनासाठी चांगलेच आहे, त्याचप्रमाणे बालपणापासूनच त्याला निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची सवय जडेल.

मधुमेहामुळे होणारे दीर्घकालीन परिणाम, विशेषत: हृदयविकार व्यायामामुळे टाळता येऊ शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींना आर्टरी ओस्क्लेरॉसिस होऊ शकतो. हा विकार झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. व्यायामामुळे तुमचे हृदय निरोगी आणि बळकट राहते.

त्याचप्रमाणे व्यायामामुळे तुम्हाला चांगले कोलेस्टरॉल राखता येते. ते राखल्यास आर्टरी ओस्क्लेरॉसिस टाळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे व्यायामामुळे रक्तदाब कमी राहणे, वजनावरील नियंत्रण, चरबी नसलेले व बळकट स्नायू, बळकट हाडे इत्यादी पारंपरिक लाभ होतातच.

सध्या आपण टेक्नोसॅव्ही काळात जगत आहोत. आताच्या काळात लोकांना मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे व्यसन जडले आहे. मुलेसुद्धा टीव्ही पाहण्याला आणि व्हीडिओ गेम खेळण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांची एकूण शारीरिक हालचाल कमी होते आणि व्यायामही कमी होतो.

ही अत्यंत चिंतेची बाब आहे. कारण त्यामुळे स्थूलपणा बळावू शकतो आणि इन्सुलिनच्या प्रति असंवेदनशीलता वाढीस लागू शकते. त्याचप्रमाणे इतर काही घटकांचा भर पडला तर मधुमेह जडू शकतो.

यात सुधारणा करून ही परिस्थिती सहज हाताळता येऊ शकते. आपण मुलांना मैदानावर जाऊन व्यायाम करण्यास सांगू शकतो. शाळांमध्ये सुद्धा व्यायामाचे वर्ग घेतले जाऊ शकतात. पोहणे, एरोबिक्स, चढणे, धावणे इत्यादींची आवड मुलांमध्ये निर्माण करावी.

घरीसुद्धा पालक आपल्या मुलांशी काही वेळ खेळू शकतात. त्यामुळे मुलांचा सर्वागीण विकास होईल. त्याचप्रमाणे स्थूलपणा, हृदयविकार आणि मधुमेहासारखे राहणीमानामुळे होणारे विकार मुलांना जडणार नाहीत.
थोडे नवीन जरा जुने