‘एक खिडकी योजनेमार्फत आता सर्व सेवा एकाच ठिकाणी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश


पुणे : कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

याबैठकीस विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीत विभागातील तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी, कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात. तसेच कोरोना बाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, कोरोना बाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वॉर्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या.

आरोग्यमंत्री श्री.टोपे यांना आढावा बैठकीत विभागातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या तयारीबाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.गायकवाड यांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी श्री.राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी अद्ययावत माहिती दिली. ससून रुग्णालयाच्या सोयीसविधा तसेच पदाबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तांबे यावेळी माहिती दिली.
थोडे नवीन जरा जुने