गृहनिर्माण संस्थेत घरकाम करणाऱ्या, कामगारांना प्रवेश नाकारू नये – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि.27 : कोविड-19 या विषाणूचा संसर्ग  टाळण्यासाठी  शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
श्री.पाटील म्हणाले, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार व वाहनचालक यांना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही.  मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच शासन नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत, अशा सूचनाही श्री.पाटील यांनी केल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने