सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत औद्योगिक संघटनांनी कोरोना संकटात मदतीसाठी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे शहरातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते.


यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे,  माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, पोलीस उपायुक्त अशोक तांबे, मनपा नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, पोलीस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, क्रेडाईचे रवी महाजन, निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव, वकील असोसिएशनचे ॲड. नितीन ठाकरे, उद्योजक प्रदीप पेशकार, आयएमएचे डॉ. समीर चंद्रात्रे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील संसर्गबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत श्री. भुजबळ यांनी मनपाने काल तयार केलेल्या डॅशबोर्डद्वारे माहिती घेतली. शहरातील २० ते ४० या वयोगटातील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांनी काळजी व्यक्त केली. क्रेडाई या संस्थेने जशी स्वतःहून मदत करण्याचे औदार्य दाखवले तसे इतर औद्योगिक संस्थांनी दाखवावे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. शासनाकडे निधीची कमतरता नाही. मात्र, या संकटकाळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजाप्रती असलेले आपले औदार्य दाखवण्याचे आवाहन श्री भुजबळ यांनी केले.
कोरोनासारखे आरोग्य संकट आले आहे. या काळात शहरातील वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाची सध्या खूप निकड असल्याचे सांगत आयएमएने जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील सर्जन यांनी सिव्हिल दवाखान्यात सेवा करावी किंवा नॉन कोविड रुग्णालयात सेवा करावी, असे आवाहन केले. शहरातील औद्योगिक संघटना, उद्योजक यांनी आता सामाजिक बांधिलकी राखत जबाबदारी घ्यावी. तसेच, प्रशासनाची संलग्न होऊन योगदान देण्याचे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.
ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या कोविड केयर सेंटरला लागणाऱ्या पूरक गोष्टी विविध संघटनांकडून उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन केले. कोरोनाच्या या काळात सर्वांनी काळजी घ्यावी तसेच येणाऱ्या पावसाळ्यात काही आजार वाढणार आहे. यामध्ये प्रामुख्याने साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे आजार पसरू नये यासाठी नागरिकांची प्रतिकार क्षमता वाढणे आवश्यक असल्याचे श्री. भुजबळ यांनी  सांगितले.
थोडे नवीन जरा जुने