शहरात उद्यापासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन

नाशिक : नाशिक शहरातील वाढती करोनाबाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता उद्यापासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषित केले. नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या व विशेषत: तरुणांचे वाढते मृत्यू या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ते बोलत होते.
 
कोरोना चा संसर्ग नाशिक शहरात वाढू लागल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रमाण ठराविक ठिकाणी होते तसेच वयस्कर वयोगटांमध्ये होते.

परंतु आता या संसर्गाचा फैलाव सर्वदूर होत चाललेला असल्याने व मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत चाललेले असल्याने अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे

अशी बाब, या संदर्भातील सर्व सांखिकी माहिती घेतल्यानंतर समोर आली असे श्री भुजबळ यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत देखील व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने

सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येतील व इतर वेळी बंद ठेवण्यात येतील असा पर्याय मांडला होता व त्याचे स्वागत श्री. भुजबळ यांनी केले होते.

त्यामुळे ५ वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. तरीदेखील करोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून शहरात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामधून जीवनावश्यक बाबींशी संबंधित व्यक्ती तसेच रात्रपाळी वरील औद्योगिक अस्थापना मधील कामगार यांना वगळण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

परंतु अशा व्यक्तीने आपले ओळखपत्र तसेच कामाची निकड पोलीस अधिकाऱ्यांना समजावून देणे गरजेचे राहील व कोणी गैरफायदा घेत असल्याचे आढळून आल्यास त्याचे विरुद्ध कठोर पोलीस कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, पोलीस उपायुक्त अशोक तांबे, पोलीस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने