शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू कक्ष तत्काळ कार्यान्वित करावा : पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करतानाच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ५५ खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तातडीने कार्यान्वित करावा, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


पालकमंत्री श्री. सत्तार धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात असली, तरी गाफिल राहून चालणार नाही. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने सतर्क राहिले पाहिजे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू कक्ष तातडीने कार्यान्वित करावा. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी होईल, असे नियोजन करावे. कापसाप्रमाणेच शेतकऱ्यांकडील मकाची माहिती घ्यावी. त्यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव यांनी शेतकऱ्यांकडील मकाचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. खरीप हंगाम सुरू झाला असून चांगला पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत युरियाची टंचाई भासणार नाही, असे नियोजन कृषी विभागाने करावे. जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ देताना जिल्हा पुरवठा विभागाने वेळोवेळी भोजनाची गुणवत्ता तपासावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत असले, तरी या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा. तसेच वेळोवेळी सॅनिटायझर, साबण लावून हात धुवावेत. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्‍य विभाग सक्षम आहे. कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रोज तीनशे नमुन्यांची तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, लवकरच ही संख्या कमी होण्यास सुरवात होईल. जिल्ह्यात ५६३२ खाटांची उपलब्धता करून ठेवण्यात आली आहे. त्यात २१६ आयसीयू खाटांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व अन्य दोन रुग्णालये मिळून पाचशे खाटांना ऑक्सिजन पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पुढील आठ दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्लाझ्मा दान करणाऱ्याचा सत्कार

यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते कोरोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्या मोहम्मद आसिफ सगीर अहमद शेख या तरुणाचा सत्कार करण्यात आला. तो महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूमुक्त झाला. त्यानंतर त्याने काल प्लाझ्मा दान केले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी केले.

लोकप्रतिनिधींसमवेत आढावा बैठक

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या साथीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती कुसुमताई निकम, कृषी सभापती बापू खलाणे, जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख, पोलीस अधीक्षक श्री. पंडित, अधिष्ठाता डॉ. सापळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल. कोरोना विषाणूची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा परिषदेने वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी. लाखतीतील उर्वरित उमेदवारांमधून पात्र उमेदवारांना महानगरपालिकेने आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही आवाहन केले.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोविड केअर सेंटर येथे रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी कॅम्प ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड केअर हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पॉइंटचे काम प्रगतीपथावर आहे, असे सांगितले.
थोडे नवीन जरा जुने