ब्रह्मपुरी शहर पुढील ३ दिवसांसाठी कडकडीत बंद

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील तीन दिवस १ जुलै ते ३ जुलै ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. 


नागरिकांनी त्यांच्याच आरोग्यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना असून कोरोना कडी तोडणाऱ्या या उपाय योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ब्रम्हपुरी उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत परवानगी मागीतली होती. ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच ब्रह्मपुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी कोरोना उद्रेकाला चालना मिळू नये ,यासाठी किमान तीन दिवस शहर बंद ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवसांसाठी याला परवानगी दिली आहे.
या काळामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत फक्त सरकारी कार्यालय,  सर्व प्रकारची रुग्णालय, औषधालय, औषधांची दुकाने सुरू राहतील. वैद्यकीय सेवेकरिता आवश्यक वाहतूक सेवे व्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक सेवा बंद राहील. त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, पूर्णत: बंद राहील. या कालावधीत शासकीय कर्मचारी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर सामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई असेल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. केवळ रुग्णालय, शासकीय कार्यालय व औषधी दुकाने या काळात सुरू राहतील. अन्य कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने