नागरिकांच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण कामांचे नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दिनांक 28 : भविष्याचा वेध घेऊन नागरिकांना कायमस्वरूपी उपयोगी ठरतील अशा जनकल्याणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य आहे. तसेच तालुकास्तरावर विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थी उंचीचे नवे शिखर पादाक्रांत करू शकतील. त्यामुळे ई-लायब्ररी, बायोटॉयलेट, नाट्यगृह यासारख्या नाविन्यपूर्ण कामांचे अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
यवतमाळ येथील विश्रामगृहात नेर, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यातील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, श्री. कारिया, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना अभ्यासाची सोय व्हावी, याकरिता तालुका स्तरावर चांगल्या दर्जाची ई – लायब्ररी उभारण्यात यावी, असे निर्देशित करून पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, यवतमाळ शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. बाहेर गावातून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी बाजारात व गर्दीच्या ठिकाणी सुलभ शौचालयाची आवश्यकता असते. यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी टॉयलेट घेऊन ते सामाजिक संघटनांमार्फत चालवण्यात यावे. नगर पालिकांनी कुठे कुठे शौचालये नाहीत व कुठे आवश्यकता आहे, याची माहिती दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी. शहरातील नाल्यातून वाया जाणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून बांधकाम, बगीच्या सारख्या ठिकाणी या पाण्याचा पुनर्वापर करता येईल का, याबाबत देखील नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्र्यांचा क्वारंटाईन कक्षातील नागरिकांशी संवाद

जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा ‘ऑनफिल्ड’ आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहेत. नेर, दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच यवतमाळ येथील कोविड केअर सेंटर आणि समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वारंटाईन असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. शासन-प्रशासन आपल्या सोबत आहे. काही अडचण असेल तर त्वरित सांगा. येथे जेवण कसे मिळते, स्वच्छता नियमित होते का, आदीबाबत त्यांनी आपुलकीने विचारणा केली. कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाईनकरिता अधिग्रहित केलेल्या इमारतींमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. येथील नागरिकांना मिळणाऱ्या जेवणाबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आहाराबाबत विशेष काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.  तसेच दिग्रस शहरातील देवनगर या प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली असता येथील गरजवंतांना अन्नधान्य किट त्वरित पुरवावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.
शहरातील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, एक डॉक्टर अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण असतो. पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतील तेव्हा रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळल्यास साथरोग पसरण्यास आळा बसेल.
थोडे नवीन जरा जुने