कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला गौरव

नांदेड, दि. २७ :- कोणत्याही गावाची चांगली प्रतिमा ही त्या गावातील सामाजिक सौहार्दावर, धार्मिक एकोप्यावर, एकात्मतेवर अवलंबून असते. या एकोप्याला, एकात्मतेला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बांधव आहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. समाजाची सुरक्षितता घेत असतांना राज्यातील 37 पोलिस जवानांना आजवर कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना कुटुंबांची अधिक काळजी घेता यावी व कुटुंबासमवेत राहता यावे यादृष्टिने सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अर्धापूर येथे उभारले जाणारे हे पोलिस स्टेशन आणि येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल हा याच प्रयत्नांचा भाग असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अर्धापूर येथील पोलिस स्टेशन इमारतीचे व पोलिस निवासी संकुलाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अर्धापूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सुमेरा बेगम शेख लायक, उपनगराध्यक्षा डॉ. पल्लवी लंगडे व मान्यवर उपस्थित होते.g
थोडे नवीन जरा जुने