३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू


वर्धा, दि ३० जून :-  राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत लागू राहणार असून जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी 31 जुलैपर्यंत कलम 144 लागू केले आहे. जिल्ह्यातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. 

तसेच रात्री नऊ ते सकाळी पाच पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई राहील.

जिल्ह्यात काही बाबी वगळता सर्वच व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र काही बाबींवर अजूनही निर्बंध आहेत. या अशा आहेत.
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण व कोचिंग संस्था पूर्णता बंद राहतील. परंतु ऑनलाईन दुरस्थ पद्धतीने अभ्यासक्रम सुरू ठेवता येईल. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव , मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह आणि  असेंब्ली हॉल इत्यादी ठिकाणे बंद राहतील.  सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक,सांस्कृतिक, धार्मिककार्य ,इतर मेळावे घेण्यास बंदी राहील. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, यामधील डायनिंग सुविधा बंद राहील. तंबाखू,पान, चहाची टपरी पुढील आदेशापर्यंत बंद राहील. सर्व  धार्मिक स्थळे,  पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद  ठेवण्यात येतील.
या बाबींच्या  व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने,व्यवसाय उद्योग सुरु राहतील. मात्र कोरोनासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.  यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.  दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यानी सांगितले आहे.
थोडे नवीन जरा जुने