नवीन तंत्रज्ञान पोहोचणार शेतकऱ्यांच्या बांधावर

अमरावती :  अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम शासनाने आखला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येत्या एक जुलैला जिल्ह्यात त्याचा शुभारंभ होणार आहे. यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
कृषी दिनानिमित्त येत्या एक जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून या काळात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करत १ ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात यावे. उपक्रमात अधिकाधिक कृषी तज्ज्ञांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पीक उत्पादनात व शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. हे लक्षात घेऊन कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेले अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.
अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन उपक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या उपक्रमात जिल्ह्याची समग्र स्थिती लक्षात घेऊन नियोजन करावे. संपूर्ण सप्ताहात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधवांकडून कृषी विषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांना कृषी संजीवन सप्ताहात भेटी द्याव्यात. त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांचे व्याख्यानही विविध माध्यमांचा वापर करून आयोजित करणे शक्य आहे, त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. त्याचप्रमाणे, कृषी विषयक योजना, पतपुरवठा यांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणिवजागृती मोहिम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बियाणे, खत निविष्ठांचे सर्वदूर वाटप

कृषी विभागाकडून स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे समूह तयार करून गावोगाव शेतकरी बांधवांना शेताच्या बांधावर निविष्ठा पुरविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. ते म्हणाले, या उपक्रमात निविष्ठांची मागणी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. कृषी सेवा केंद्रचालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन झालेल्या मागणीनुसार निविष्ठांचा पुरवठा करण्यात आला. बांधावर निविष्ठा पुरवठ्यासाठी जिल्ह्यात ५८८ समूह तयार करण्यात आले व त्यांना निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात अद्यापपर्यंत सात हजार ५३ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ३ हजार २९४ मे. टन खतांचा पुरवठा थेट बांधावर करण्यात आला असून, कापूस बियाण्याची १८ हजार ६४१ पाकिटे वाटण्यात आली आहेत, अशी माहिती श्री. चवाळे यांनी दिली.
थोडे नवीन जरा जुने