कोरोनाच्या काळात देखील सामाजिक बांधिलकी जपण्याची अंध बांधवांकडे दृष्टी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : कुठलही काम करण्यासाठी केवळ डोळे असून चालत नाही तर त्याच्याकडे बघण्याची दृष्टी देखील असावी लागते. ती दृष्टी खऱ्या अर्थाने दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशच्या अंध बांधवांकडे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक यांच्यावतीने अंध बांधवांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड १९ ब्रेल पुस्तिकेचे प्रकाशन छगन भुजबळ यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी एबीपी माझाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, रोटरी क्लबचे गिरीश अग्रवाल, द्वारकानाथ जालान, दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन मानद अध्यक्ष डॉ.विजय घाटगे, लायन्स क्लबचे विजय भंडारी, महेंद्र मोरे, राजेंद्र गोयल, दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारसकर, कल्पना पांडे, भगवान पवार, विजय काळभोर आदी मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारसकर, डॉ.विजय घाटगे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी अंध बांधवांसाठी ‘कोविड – १९ ब्रेल’ या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य नागरिक हा वर्तमान पत्र तसेच इतर माध्यमातून माहिती घेऊ शकतो मात्र अंध बांधव ती घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतून बनविलेले हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव अद्याप सुरु असून अजून किती दिवस आपल्याला कोरोनाशी लढावे लागेल याची कल्पना नाही. ज्यांना दिसते त्या सर्वांना प्रशासन कोरोनाच्या उपाययोजना करण्यास सांगत आहोत तरी देखील तरुण रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. खरेतर हा आजार आपल्या कडे हवेतून येत नाही तर आपण त्याच्याकडे जात आहोत याकडे सर्वांनी लक्ष देऊन योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. शासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी देखील झाले असल्याचे त्यांनी सांगत देशभरातील अंध बांधवाना कोरोनाची माहिती मिळण्यासाठी हे पुस्तक हिंदी भाषेत देखील छापण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले, केवळ नाशिक नव्हे तर राज्य देशपातळीवर भारसकर यांचे काम आहे. त्याचे हे काम सगळ्या समाजाने उघड्या डोळ्यांनी बघावे. कोरोनाच्या काळात अनेक लोक घाबरून घरात बसले आहे. मात्र या संस्थेच्या माध्यमातून भारसकर व त्यांच्या टीमने अंध बांधवांसाठी मोठे काम उभे केले असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
यावेळी मानद अध्यक्ष डॉ. विजय घाटगे म्हणाले, सामान्य नागरिकांना वर्तमान पत्र व इतर माध्यमातून माहिती मिळते मात्र अंध बांधवाना याबाबत माहिती मिळावी यासाठी या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने