मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

मुंबई, दि. १७: भारत-पाकिस्तानदरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या, मेजर जनरल पी. व्ही. तथा पद्मनाभ विद्याधर सरदेसाई यांच्या निधनाने भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे.

त्यांच्या शौर्याला आणि असीम त्यागाला कोणताही भारतीय विसरणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांना श्रध्दांजली वाहिली. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता.

भारत-पाकिस्तान युद्धाचा विजय हा सर्व भारतीयांसाठी कायमच आदराचा आणि अभिमानाचा विषय राहिला आहे. या युद्धात एका बॉम्बस्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांनी सैन्याच्या माध्यमातून आपली देशसेवा कायम ठेवली.

या ऐतिहासिक युद्धाच्या विजयातील महत्त्वाचा योद्धा असणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात कायमच आदर आणि अभिमान राहील.

मेजर जनरलच्या पदापर्यंत पोहोचलेल्या सरदेसाई साहेबांचे शौर्य आणि असीम त्याग कोणताही भारतीय विसरणार नाही. मेजर जनरल पी.व्ही सरदेसाई हे पुण्याचे प्रसिद्ध धन्वंतरी स्वर्गीय डॉ.ह.वि.सरदेसाई यांचे धाकटे बंधू होते.

देशसेवेसह वैद्यकसेवेचा मोठा वारसा असणाऱ्या सरदेसाई कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
थोडे नवीन जरा जुने