सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार

पुणे : सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगतानाच लवकरच सारथीच्या अडचणीसंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल

तसेच मराठा-कुणबी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

तसेच यावर्षीच्या अर्थसंकल्पात सारथीसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेच्या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री वडेट्टीवार म्हणाले,

केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये यश मिळविण्यात मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी सारथीच्या माध्यमातून यापुढेही व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील.

कौशल्य विकास विषयक प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, आवश्यक पदे भरण्यात यावीत तसेच महिलांना प्राधान्य देण्यासोबतच विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी संस्थेने प्रयत्न करावेत,

अशा सूचनाही त्यांनी केल्या. सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सारथीचे आगामी नियोजन तसेच अडचणीबाबत माहिती दिली. यावेळी सारथीचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने