माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रातील ‘जलक्रांती’चे जनक, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्तानं (14 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील स्वर्गीय चव्हाण साहेबांचं योगदान कधीही विसरता येणार नाही.

त्यांच्यासारखं अभ्यासू, दूरदृष्टीचं, कुशल नेतृत्वं लाभल्यामुळेच महाराष्ट्र आजची प्रगती करु शकला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वर्गीय चव्हाण साहेबांना अभिवादन करताना म्हणाले की, यंदा स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलेल्या जलक्रांतीचं राज्याच्या विकासात मोठं योगदान आहे. या योगदानाची माहिती, महत्त्व लोकांपर्यंत नेण्यासाठी, जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाचा ‘जलभूषण’ पुरस्कार देऊन यंदा गौरवण्यात येत आहे.

उद्या त्यांच्यावरील गौरवग्रंथाचं, मासिक ‘लोकराज्य’ विशेषांकाचं प्रकाशन करुन त्यांच्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी राज्यात आणि केंद्रात अनेक महत्‍त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली. ती पार पाडताना महाराष्ट्राचा गौरव वाढवला.

सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला, पदाला न्याय दिला. केंद्रात, राज्यात कार्याचा, व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी राज्यातील प्रशासनाला शिस्त लावून इथल्या विकासाला खऱ्या अर्थानं गती दिली.

त्यांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, घेतलेले निर्णय हे आपल्या सर्वांना आजही मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
थोडे नवीन जरा जुने