वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री


सिंधुदुर्गनगरी, दि. ३ – जिल्ह्यात येत्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. 
त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले. आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सवेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी आरोग्य शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाणे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, आरोग्य खात्याचे उपसचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्र, रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी हे सहभागी झाले होते. तर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयालगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे वर्ग केल्यानंतर तातडीने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करता येईल असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, याविषयीची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी तातडीने करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्य स्तरावरील इतर मंजुऱ्या मिळण्यास कोणतीही अडचण नाही. जिल्हाधिकारी यांनी याविषयीचे सर्व प्रस्ताव आरोग्य विभाग व आरोग्य शिक्षण विभागास सादर करावेत. त्यास मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीमध्ये सादर करुन मंजुरी घेता येईल असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य शिक्षण संचालक तात्याराव लहाणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार आहे. तांत्रिक बाबी, यंत्रसामुग्री खरेदी, मनुष्यबळ निर्मिती, या सर्वांचे प्रस्ताव तयार आहेत. जागेचा प्रश्न फक्त मार्गी लागणे बाकी आहे. जागा आरोग्य शिक्षण विभागास वर्ग केल्यानंतर तातडीने काम सुरू करता येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाची नियोजित जागा तातडीने वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील वर्षी अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
त्यामुळे आता जिल्ह्यात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रत्नागिरी येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने