बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 28 : कोरोना संकटकाळात दक्षतेचे पालन न करता बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिस्त निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.. यशोमती ठाकूर यांनी वरुड येथे दिले.


 

वरुड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री यांनी वरुड न.प. सभागृहात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष स्वाती आंडे, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, उपाययोजना, विलगीकरण स्थिती आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी साबणाचे द्रावण फवारणी,

सडा यांचा वापर करावा. नागरिकांनीही घरालगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी असे द्रावण फवारणे उपयुक्त ठरेल. यंत्रणेने तपासण्यांची संख्या वाढवावी व सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा अवलंब करता येतो. तसा उपाय आपण यापूर्वीही केला आहे. मात्र, स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

लॅब टेक्निशियनबाबत पाठपुरावा करू

वरुड तालुक्यात सहा लॅब टेक्निशियन मिळाल्यास स्वॅब मिळवणे व तपासणीच्या कामाला वेग येईल, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यानुसार प्रस्ताव द्यावा. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

रुग्णवाहिकेची उपलब्धता

कोरोना संशयितांसाठी वरूड तालुक्याला स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास उपाययोजनांना गती येईल, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार अशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार श्री. भुयार यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली व त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

तालुक्यातील  अपूर्ण पाणीपुरवठा योजना, तसेच नव्याने करावयाची कामे याबाबत प्रस्ताव द्यावेत. त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही व्हावी

कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.     

दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करावा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन या दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करणे अपरिहार्य आहे. कुणीही ते टाळून आपल्यासह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू नये, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नेर पिंगळाई येथे केले.

कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा  पालकमंत्री श्रीमती ठाकूर या सातत्याने घेत आहेत. आज त्यांनी मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, सावरखेड या गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला, तसेच क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली व दाखल नागरिकांशीही संवाद साधून मनोबल वाढवले.

थोडे नवीन जरा जुने