कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री दादाजी भुसे

भंडारा दि. 4 (जिमाका): 1 जुलै माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1 ते 7 जुलै 2020 हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.

कृषी विद्यापिठाचे कुलगुरु व विद्यार्थी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

पवनी तालुक्यातील निलज येथे शिवार फेरी व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी व्ही. जे. पाडवी, प्रगतशील शेतकरी संजय एकापूरे प्रामुख्याने उपस्थित होते.

निलज येथील प्रगतशील शेतकरी नरेंद्र ढोक यांनी प्रतिकूल परिस्थितीत कारल्याची शेती करून आदर्श निर्माण केला. याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे तरच कृषी दिनाचा उद्देश सफल होईल,

असे कृषिमंत्री यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, गोसेचे पाणी व वीज शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे.

अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. याबाबत जाणीवपूर्वक लक्ष घालून शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले..

शेतकऱ्यास खताचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावर्षी पाऊस लवकर आल्याने हंगामास लवकर सुरुवात झाली.

त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना लागतो तेवढा खतांचा पुरवठा करण्यासाठी शासन तत्पर आहे. अतिरिक्त खताचा वापर करु नये त्यामुळे शेतीचे जीवनमान कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

कृषि विभागाने खतांच्या उपलब्धतेबाबत लक्ष घालून दुकानामध्ये गैरव्यवहार होणार नाही यांची दक्षता घ्यावी. गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदार व कंपन्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तहसिलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. माझा शेतकरी बांधव आनंदी व सुखी झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकार करा, असेही ते म्हणाले.

कृषि विद्यापिठाप्रमाणे प्रगतीशिल शेतकरी चालते बोलते विद्यापिठ आहे. राज्यात 3 ते 4 हजार प्रगतिशिल शेतकरी गावागावात शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करणार आहेत.

टाळेबंदीच्या काळात राज्यात शेतकऱ्यांनी मोठा हातभार लावून धान्य व भाजीपाला कमी पडू दिला नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम उभे आहे, अशी ग्वाही कृषि मंत्र्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे ते म्हणाले. प्रारंभी नरेंद्र ढोक यांच्या कारल्याच्या बागेत कृषिमंत्र्यांनी शिवार फेरी करुन कारले,

चवळी, काकडी, वालाच्या पिकाचे निरीक्षण करुन माहिती जाणून घेतली. सौर ऊर्जेवरील उपकरण,क्राप्ट पॉलीनेशन तसेच स्प्रिंगलर या अभिनव उपक्रमाची पाहणी केली.

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी वन विभागामार्फत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय व जंगली श्वापदांमुळे पिकाचे नुकसान,

वनविभागाच्या आर्थिक सहाय्यतेचा अभाव तसेच श्वापदाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यावर दाखल होणारे गुन्हे, धान खरेदी केंद्रात वाढ, गहू खरेदी केंद्राची आवश्यकता आदी प्रश्नांची जाणीव करुन दिली.

कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषीमंत्र्यांचे हस्ते प्रगतिशिल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, तहसिलदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने