‘लॉकडाऊन’मध्ये श्रमिकांच्या मदतीला मनरेगा

नागपूर, दि. 1 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामे राज्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली.

 राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मागेल त्याला काम या तत्त्वानुसार 57 हजार 550 कामे पूर्ण करण्यात आली असून यावर 285 कोटी 36 लक्ष रुपये मजुरीवर तर 84 कोटी 14 लक्ष रुपये साहित्यावर खर्च करण्यात आल्यामुळे श्रमिकांना गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती  मनरेगा आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली.

मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करुन  दिल्या जात आहे. यासाठी 19 प्रकारच्या कामांसाठी साधारणत: 5 लाख 87 हजार 360 कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे. राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यापासून ते 29 जूनपर्यंत रोहयोच्या कामावर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत राज्यात 22 लाख 26 हजार 878 एकल जॉब कार्डधारकांची संख्या असून यात 8 लाख महिला तर 14 लाख 25 हजार पुरुषांचा समावेश आहे.  जॉबकार्ड असलेल्या मजुरांना  प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती आयुक्त  श्री. नायक यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास अंतर्गत 26 हजार 984 घरकुल पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून घरकुल बांधकामाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत राज्यात 26 हजार 984 घरकुलाचे काम पूर्ण झाले असून यासाठी 47 कोटी 3 लक्ष रुपये लाभार्थ्यांना निधी देण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मजुरी मंजूर करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अमरावती विभागात 6 हजार 826 घरकुले बांधण्यात आली असून त्यावर 11 कोटी 88 लक्ष 53 हजार 386 रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागपूर विभागात 4 हजार 267 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर 7 कोटी 89 लाख 43 हजार खर्च झाला आहे. विभागातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 066, नागपूर 605, भंडारा 537, गोंदिया 241, वर्धा 338 तर गडचिरोली जिल्ह्यात 445 घरकुल पूर्ण झाले आहे. अमरावती विभागात अमरावती 1 हजार 641, अकोला 260, बुलडाणा 1 हजार 114, वाशिम 227 तर यवतमाळ जिल्ह्यात 1 हजार 991 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती  मनरेगा आयुक्त श्री. नायक यांनी दिली.
3 हजार 493 जलसिंचन विहिरी
शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसिंचन विहिरीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात 3 हजार 493 जलसिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरीसाठी 47 कोटी 86 लक्ष 22 हजार 434 रुपये तर साहित्यासाठी 34 कोटी 24 लक्ष 42 हजार रुपयांचा निधी  खर्च करण्यात आला आह.
 जलसिंचन विहिरी अंतर्गत नागपूर विभागात  169 विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी 1 कोटी 36 लक्ष रुपये तर साहित्यासाठी 1 कोटी 79 लाख खर्च झाला आहे. अमरावती विभागात 1 हजार 22 विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीसाठी 11 कोटी 67 लक्ष रुपये तर साहित्यासाठी 8 कोटी 68 लक्ष रुपयांचा निधी खर्च झाला असल्याची माहिती यावेळी मनरेगा आयुक्तांनी दिली.
मनरेगांतर्गत फळबाग योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून विभागातील नागपूर, वर्धा,  गोंदिया तसेच अमरावती विभागातही राबविण्यात येत आहे. विदर्भात 1 हजार 426 लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मजुरी तसेच साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने