हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे – वनमंत्री संजय राठोड

ठाणे, दि. १ : हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन राज्याचे वन व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी केले.


वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज ठाणे जिल्ह्यातील मौजे शीळ पनवेल रोड भंडार्ली येथे वृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे व उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा , वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी तसेच जनतेला वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिम आयोजित करण्यात आली आहे. 
वनमंत्री श्री. राठोड यावेळी म्हणाले, भारतीय वन सर्वेक्षण 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात वनक्षेत्राचे प्रमाण 30.1 टक्के इतके असून हे प्रमाण भारताच्या वनक्षेत्राच्या प्रमाणात 8.65 टक्के इतके आहे. भारतीय वननीती नुसार हे प्रमाण भौगोलिक क्षेत्राच्या 30 टक्के एवढे क्षेत्र असावे असे उद्दिष्ट राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तसेच बदलत्या जागतिक वातावरणाचा समतोल राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
वनमंत्री अधिक माहिती देताना म्हणाले, 2017 च्या तुलनेत महाराष्ट्रातील वनक्षेत्रात वर्षभरात सुमारे 97 हजार 500 हेक्टरने वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे वनक्षेत्रावरील वृक्षाची वाढ होऊन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी राहिले आहे. त्यासाठी वृक्षलागवडीची चळवळ जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासन सातत्याने वनक्षेत्र व्यतिरिक्त क्षेत्रावर सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहे.
पाच वर्षात दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प
2020 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी 2 कोटी याप्रमाणे एकूण 10 कोटी  वृक्षलागवड करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. राज्यातील वनक्षेत्र मर्यादित असल्याने वृक्ष लागवडीस तिथे कमी वाव आहे. त्यामुळे वनेतर क्षेत्रामध्‍ये वृक्ष लागवडीस मोठ्या प्रमाणावर चालना देणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन दरवर्षी 2 कोटी वृक्षलागवड वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर उर्वरित विभागांनी त्यांच्या त्यांच्या परीने वृक्षलागवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.त्यांच्यासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आलेले आहेत.सर्व नागरिकांनी या मोहिमेमध्ये भाग घेऊन हरित महाराष्ट्र घडविण्याकरिता आपले योगदान द्यावे असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने