कृषी सचिव यांनी शेतकऱ्यांशी बांधावर साधला संवाद

धुळे, दि. ३ : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 या उपक्रमाचाच एक भाग म्हणून  कृषी मंत्री दादाजी भुसे व कृषी सचिव प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पीक परिस्थिती पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधत आहेत.  या पार्श्वभूमीवर सचिव श्री. डवले यांनी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांशी आज संवाद साधला.

कृषी सचिव श्री. डवले यांनी आज सकाळी धुळे तालुक्यातील आर्णी येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल पाटील यांच्या कपाशी लागवड क्षेत्रास भेट दिली. मूग, भुईमूग, उडीद, कपाशीतील आंतर पीक पद्धतीची पाहणी केली. मका, राळा, ज्वारीच्या सापळा पीक पद्धतीने केलेल्या पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हरीत महाराष्ट्र 20 या अभियानात बांधावर जांभूळ, सीताफळाच्या रोपांची लागवड श्री. डवले यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी रमेश पोतदार यांनी मंडळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
फागणे येथील विठ्ठल चौधरी यांच्या रोपवाटिकेस सचिव श्री. डवले यांनी भेट दिली. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकरी उमेश चौधरी यांनी माहिती दिली. तेथे अंजीरच्या रोपांची लागवड करण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाने, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील विषयतज्ज्ञ रोहित कडू, दीपक जाधव, कृषी सहाय्यक रीना काशीनाथ देवरे, बी व्ही सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने