रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत

अमरावती : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत राज्याचे ६ हजार ५५० किलोमीटरचे, तर अमरावती जिल्ह्यात १७६ किलोमीटर रस्तेनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.


रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. योजना प्रकल्पाचे उपअभियंता सचिन चौधरी यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत उद्दिष्टानुसार रस्ते विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, दळणवळणाची सुविधा,  शाळा-महाविद्यालय, पोलीस केंद्र, चौकी आदी सुविधा असलेल्या गावांना जोडून विकास गतिमान करण्याचे व परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. नागपूर येथील सुदूर संवेदन केंद्राद्वारे उपग्रहाच्या माध्यमातून परिसराचे अवलोकन करून रस्त्यांचे नियोजन केले जाणार आहे. ज्या गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील, त्या गावांना जोडण्यात येणार आहेत. जेणेकरून परिसरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा असावी, तसेच या सुविधांचा दर्जा वाढावा व त्यात सातत्य राहावे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेऊन कमीतकमी १० किमी हून अधिक रस्ता प्रत्येक तालुक्यात या योजनेतून साकारला जाणार आहे. मेळघाट व धारणीसाठी ही मर्यादा ३० किलोमीटरची आहे. त्यानुसार या योजनेतून विविध सुविधा असलेल्या गावांना जोडण्यात यावे. दुर्गम परिसरातील नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. अमरावतीत बारा किलोमीटर रस्ता या योजनेत प्रस्तावित आहे.
धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील कामांना सुरुवात झाली आहे. इतर तालुक्यातही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही ही योजना पूरक ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण होतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामे मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा होत आहे. त्यात २६५ किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्याही कामांना गती देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्तेविकास उपक्रमाला गती मिळण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारीत येत नसलेल्या क्षेत्रात कामे सुरु करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, उर्वरित कामांना वन विभागाची परवानगी व आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या रस्ते विकासात कुठेही अडथळा येता कामा नये. पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात, तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डेदुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. मेळघाटातील रस्ते विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. मेळघाटात दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये, यासाठी विशेष लक्ष पुरवून गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.
थोडे नवीन जरा जुने