पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज – पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे

सोलापूर, दि. १ : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान वृक्ष लागवड मोहिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


मंत्री श्री. ठाकरे यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आवारात वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तुळशी वृंदावन येथे वृक्षारोपण केले. यावेळी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, उपविभागीय अधिकारी उदय भोसले, सहायक वनसंरक्षक आय.एच.शेख, के.एस. आहीर, व्ही.एन. पवळे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वृक्ष हे जल व मृद संधारणाचे महत्वाचे साधन आहेत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न वृक्ष लागवडीतूनच मिळणार आहे. प्रदूषण नियंत्रणात वृक्षांचे महत्व जाणून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी.
पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्षांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे. यावेळी त्यांनी वन विभागाने साकारलेल्या तुळशी वृंदावनाची पाहणी करून कामाचे कौतुक केले.
थोडे नवीन जरा जुने