भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने ज्येष्ठ विधिज्ञ व विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. २४ :ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने विख्यात विधिज्ञ व विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपले अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


 

अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना मंत्री श्री. थोरात म्हणाले की, वकिली आणि सामाजिक क्षेत्रात ते गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत होते. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील व न्यायाधीश घडवले आहेत.

बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो लेख लिहिले व व्याख्याने दिली आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्त्वपूर्ण ठरले होते.

विविध वकिल संघटनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कमिटीवर देखील त्यांचा समावेश होता. मी पुणे येथे एलएलबीचे शिक्षण घेत असताना त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे

त्यामुळे ते माझेही गुरु राहिले आहेत.भास्करराव आव्हाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आव्हाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे श्री. थोरात म्हणाले.

थोडे नवीन जरा जुने