जलसाठ्याचे फेरनियोजन व्हावे – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती, दि. ३ : सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी प्रकल्पातील जलसाठ्याचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व बाबी तपासून फेरनियोजनाचा प्रस्ताव करावा, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत जलसंपदा प्रशासनाला दिले.


राज्य जलसंपदा नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री. कडू हे अमरावती येथून सहभागी झाले होते. राज्यातील विविध विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर होणे आवश्यक असते. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होईल. नागपूर विभागात नियोजित केल्याप्रमाणे 13 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. प्रत्यक्षात 8 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. उर्वरित पाच लाख हेक्टर जमीनीच्या सिंचनाबाबत फेरनियोजन होऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
प्रकल्पांतर्गत परिसरात जमा होणारी वाळू सिंचनाच्या प्रकल्पासाठी वापरण्यात यावी, तसेच सर्व बाबींचा विचार करून सुधारित पाणीपट्टी दर तयार करण्यात यावे, असे राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले.
पैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प राबवावा
राज्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी पैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा. त्यामुळे विविध विभागांतील शेतीला फायदा होईल व पेयजलाचाही प्रश्न सुटेल, असेही निर्देश त्यांनी दिले.
थोडे नवीन जरा जुने