‘अमृत आहार’ अंतर्गत पालघरमधील लाभार्थ्यांना कच्च्या स्वरुपातील धान्याचे नियमित वाटप

मुंबई, दि. 3 – कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातील स्तनदा माता व अंगणवाडीतील बालकांना अमृत आहार योजनेतील अन्न हे शिजवून न देता ग्रामपंचायत स्तरावरील आहार समितीमार्फत कच्च्या धान्याच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

एप्रिल ते जून अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेतील आहाराचे धान्यस्वरुपात वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेने दिली.

आदिवासी भागातील गरोदर, स्तनदा माता तसेच अंगडणवाडीतील 6 वर्षापर्यंतच्या बालकांना अमृत आहार योजनेद्वारे शिजवलेले अन्न देण्यात येते. मोखाडा व जव्हार तालुक्यातील गरोदर व स्तनदा माता यांना रोज एक वेळ शिजवलेले चौरस आहार देण्यात येत होते. तसेच अंगणवाडी केंद्रातील बालकांना सेंट्रल किचन व आहार समितीमार्फत शिजवलेले अन्न वाटप करण्यात येत होते. मात्र, कोविड-19 च्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिजवलेले अन्न देणे तसेच अंगणवाडीमध्ये बालकांना एकत्र करून शिजवलेले अन्न देण्यास अडचणी येत असल्याने लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावरील आहार समितीमार्फत कच्चे धान्य वाटप करण्यात येत आहे. गरोदर व स्तनदा मातांसाठी चपाती/भाकरीसाठी अडीच किलो गहू किंवा तांदूळ, तांदूळ दीड किलो, तूरडाळ ७५० ग्रॅम, शेंगदाणे ७५० कि.ग्रॅ, गूळ सव्वा दोन किलो, २५ अंडी किंवा ५० केळी, हिरव्या पालेभाज्या सव्वा किलो,  ६२५ ग्रॅम खाद्यतेल, ५० ग्रॅम मसाला, १० ग्रॅम हळद पावडर, मीठ ५० ग्रॅम या साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
या योजनेअंतर्गत एप्रिलमध्ये जिल्ह्यातील १३८७ अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना कच्चे धान्य, ५०६ अंगणवाडी केंद्राना सेंट्रल किचन द्वारे आणि ८१५ अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना आहार समितीमार्फत शिजवलेले अन्न वाटप करण्यात आले असून या महिन्यात २३ हजार २३४ गरोदर, स्तनदा माता आणि १२९३०९ बालकांनी याचा लाभ घेतला आहे. तर मे महिन्यामध्ये जिल्ह्यातील २४ हजार ४२८ गरोदर, स्तनदा मातांना व १३८०९२ बालकांना कच्चे धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके, तीव्र कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा माता तसेच ११ ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलींना जून अखेरपर्यंतचे कच्चे धान्य वाटप करण्यात आले असून जुलै व ऑगस्टचे धान्य वाटप सुरू झाले असून आतापर्यंत ४० टक्के धान्याचे वाटप पूर्ण झाले आहे.
जव्हार तालुक्यातील कडव्याची माळी, हिरडापाडा, नागमोडा या गावांमध्ये लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत कच्च्या धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. 
वर्तमानपत्रात नमूद केलेल्या लाभार्थी श्रीमती मिनाक्षी डगळे यांनाही कच्च्या स्वरुपातील धान्य वाटप करण्यात आले असून अंगणवाडी सेविकामार्फत ते त्यांना मिळाले असल्याचे त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
थोडे नवीन जरा जुने