ठक्कर डोम कोविड केअर सेंटर ही संकट वाढण्याआधीची पूर्वतयारी – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. ४ (जिमाका) : ठक्कर डोम कोविड केअर सेंटर ही संकट वाढण्याआधीची पूर्वतयारी असून, त्या अनुषंगाने कोरोना रूग्णांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असलेले हे सेंटर असणार आहे,

असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते आज शहरातील नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ठक्कर डोम येथे क्रेडाई व ठक्कर बिल्डर्स यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या तयारीची पाहणी करताना बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बाधितांची संख्या ‍ वाढत चालली आहे.

त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून 350 खाटांचे कोविड केअर सेंटर येथे उभारण्यात येत असून, त्यातील 50 खाटा ऑक्सिजन रूग्णांसाठी राखीव असणार आहेत.

या सेंटरमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता व ड्रेनेज यांची योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. परिसरातील रहिवाशांना या सेंटरपासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच स्त्री व पुरूष, आरोग्य सेवक, पोलीस यंत्रणा यांच्यासाठी वेगवेगळी स्वच्छता गृह उभारणे, चांगल्या प्रतीची भोजन व्यवस्था करणे,

रिक्रिअेशन रूममध्ये पेशंटचे मन रमेल यासाठी टीव्ही, मोबाईल व दूरध्वनी यांची व्यवस्था करणे जेणेकरून रूग्ण आपल्या घरच्या लोकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करू शकतील.

कॅरम बोर्ड, बुद्धिबळ आदी बैठे खेळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जे आरोग्य सेवक, पोलिस कर्मचारी या संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत,

त्यांच्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

खाजगी हॉस्पिटल संदर्भात सातत्याने अवाजवी बिलासंदर्भात तक्रारी येत असतील, तर त्यांची शहानिशा करून व सत्यता पडताळून कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना आहेत.

संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आज ढासळलेली असून, अर्थव्यवस्थेला गती देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने व उद्योगधंदे सुरू राहिले पाहिजे.

सध्या आपण सायंकाळी 7.00 ते पहाटे 5.00 पर्यंत नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यासा मज्जाव केला आहे. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने