संगीतसूर्य केशवराव भोसले ऑनलाईन महोत्सवाचा शुभारंभ

अमरावती, दि. २ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपल्या कलेतून सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटविला.  


त्यांचे हे कार्य तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सांस्कृतिक परिषदेचा उपक्रम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेतर्फे ऑनलाईन प्रथम आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ठायी अफाट प्रतिभा व प्रज्ञेचा संगम झालेला होता.

दुर्देवाने त्यांना अल्पायुष्य लाभले. मात्र, त्यांनी संगीत क्षेत्रात केलेली कामगिरी अतुलनीय आहे. परिषदेच्या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे कार्य तरूणांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या कोरोना संकटकाळामुळे गर्दी टाळण्यासाठी जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा आली तरीही, याप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन माध्यमांद्वारे सातत्याने व्हावेत. सांस्कृतिक वसा जपला जावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महोत्सव दि. ९ ऑगस्टपर्यंत चालणार असून, रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल त्यात असेल. फेसबुकवर हे कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहेत. यानिमित्त विविध मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.

महोत्सवात अभिनेते भारत गणेशपुरे, लेखक डॉ. संजय सोनवणी, डॉ. सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग आहे, अशी माहिती सांस्कृतिक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष वर्षाताई धाबे यांनी दिली. अरविंद पाटील यांनी प्रास्ताविकपर भूमिका मांडली. क्षिप्रा मानकर, डॉ. स्वाती पडोळे यांनी निवेदन केले.

परिषदेच्या प्रमिलाताई भिसे, राजीव चव्हाण, अतुल टोंगे, हर्षा ढोक, संजय बावळसुरे, ओजस केदार, सूर्यकांत शेजूळ, अशोक दुधारे यांनी आयोजन केले.

थोडे नवीन जरा जुने