संजय भाटिया यांनी घेतली उपलोकायुक्त पदाची शपथ

 मुंबई, दि.28:  मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटिया यांनी आज राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाटिया यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटिया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली.

 

शपथविधी सोहळ्याला प्रभारी लोकायुक्त डॉ.शैलेश कुमार शर्मा, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, राज्य मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भगवत व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

सन 1985 च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असलेले भाटिया यांत्रिकी शाखेतील अभियंते असून ऑस्ट्रेलिया येथील सदर्न क्रॉस विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. आपल्या सेवाकाळात भाटिया यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विक्रीकर आयुक्त तसेच अध्यक्ष, मराविमं या पदांसह अनेक पदे भूषविली आहेत.

थोडे नवीन जरा जुने