पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 अमरावती, दि. ३१ : जिल्ह्यात सार्वजनिक इमारतीची प्रस्तावित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले.जिल्हा परिषद व इतर महत्त्वाच्या कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतींचा आराखडा, नियोजन व अपेक्षित कामे आदींचा आढावा घेण्यासाठी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभा खोडके, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, इमारतीचे आराखडे परिपूर्ण असावेत. त्यांची रचना चांगली व नाविन्यपूर्ण व्हावी. दीर्घकालीन दृष्टीने नियोजन व्हावे. इमारतींचे स्वरूप चांगले, कल्पक, सौंदर्यपूर्ण असावे. महापुरुषांच्या म्युरल्स, प्रतिमा आदींचा समावेश असावा. अमरावती जिल्हा ही संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख अशा अनेक संत, महात्मे व महापुरुषांची भूमी आहे.

इमारतींच्या प्रस्तावात फर्निचर, सभागृहात अभ्यागतांसाठी गॅलरी आदी सुविधांचा समावेश असावा. इमारतीचे काम दीर्घकाळासाठी असते त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अमरावती जिल्हा परिषद, विविध पंचायत समिती, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विविध कार्यालयांच्या नियोजित इमारतीबाबत यावेळी चर्चा झाली.

थोडे नवीन जरा जुने