प्रत्येक गरजूला हक्काचे घर मिळवून देणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 अमरावती, दि. २८ : आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे विविध आवास योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहे. वलगाव ग्रामपंचायती अंतर्गत २५४ अतिक्रमण प्रशासनाव्दारे नियमानुकूल केल्याने गोरगरिबांना हक्काचे घर उपलब्ध होईल. यापुढेही जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुल मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

वलगाव येथील सिकची रिसोर्ट येथे ‘सर्वांसाठी घरे 2022’ अंतर्गत अडीचशेवर अतिक्रमणे नियमानुकूल झाल्याने नमुना ८ प्रमाणपत्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ‍पंचायत समिती सभापती संजना काळे, जि. प. सदस्य गजानन राठोड, सरपंच मोहिनीताई मोहोड, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, अनिसभाई मिर्झा, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रणजीत भोसले, प्रमोद कापडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, वलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने येथील गोरगरिबांना नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होईल. संबंधित व्यक्तींना शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जाईल. या माध्यमातून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येथील पदाधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेले, तथापि, यापुढेही उर्वरित ३२९ जागांचे राहिलेल्या नियमानुकूलनाची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण करुन संबंधितांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अजूनही कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर मात करून विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही साथ देणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स आदींचा अवलंब करून स्वत:ची काळजी घेतली नाही तर व्हेंटिलेटर लागण्याची वेळ येऊ शकते, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बोलताना सोशल डिस्टन्स पाळणे आदी उपाययोजना कसोशीने पाळाव्यात. सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होत असल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. स्वत:सह कुटुंबातील इतरांना कोरोनाची बाधा होणार याची दक्षता घ्यावी. आजाराचे लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करावा.

कोविड-१९ हा आजार पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे घाबरुन न जाता आजाराची लक्षणे दिसल्यास स्वत:हून समोर या आणि आपल्यासह इतरांना बाधित होण्यापासून बचाव करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने नमुना ८ प्रमाणपत्रांचे काही जणांना प्रातिनिधीक स्वरुपात वितरण तसेच आवास योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने