माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाचे अपार नुकसान – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 मुंबई, दि.३१ : लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फार मोठे योगदान दिले असून यावेळी त्यांचे जाणे मनाला चटके लावून जाते, अशी शोकसंवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रणवदांनी एक उत्कृष्ट व व्यासंगी राजकारणी म्हणून आपली भूमिका बजावली आहे. खासदार, मंत्री व नंतर देशाचे राष्ट्रपती अशी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावल्या. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देशसेवा केली असून त्यांची आठवण ही सदैव प्रेरणादायी ठरणार आहे.

ते ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान, सुसंस्कृत व राजकारणी होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. मनमोहनसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद  सांभाळत त्यांनी नव्या आर्थिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. ते आज काळाच्या पडद्याआड गेल्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.  अशा महान नेत्याच्या निधनामुळे मला अतीव दुःख झाले असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे, अशा शब्दात डॉ. राऊत यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

थोडे नवीन जरा जुने