पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते पारधी समाजातील लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण

 मुंबई, दि. 28: मालाड, मालवणी अंबोजवाडी येथील पारधी समाजातील 23 लाभार्थ्यांना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेतून पारधी समाज बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात येते. पारधी समाज बांधवांनी स्वयंरोजगार करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून श्री. शेख यांच्या हस्ते आज मालाड अंबोजवाडीतील पारधी बांधवांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

मंत्री श्री. शेख याप्रसंगी बोलताना म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला स्वत:चा उत्कर्ष करुन घेण्यासाठी समान संधी मिळणं गरजेचं आहे. पारधी समाजातील तरुण-तरुणींनी पारंपरिक व्यवसायात अडकून न पडता समृद्धीची, प्रगतीची दारे त्यांनादेखील खुली व्हावीत यासाठी विविध योजना शासनातर्फे राबवण्यात येणार आहेत.

याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या  प्रकल्प अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने