किसान रेल्वेला लासलगांवला थांबा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी

 मुंबई, दि. 8 :  केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या किसान रेल्वेला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगांव रेल्वे स्थानकात मात्र थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्यात यावा, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

याबाबत मंत्री श्री. भुजबळ यांनी रेल्वे मंत्री श्री.गोयल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने देवळाली ते दानापूर पर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. या माध्यमातून नाशवंत भाजीपाला व नाशिक जिल्ह्यातील फळांची उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा किसान रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सुरुवातीला ही किसान रेल्वे आठवड्यातून एकदा चालू होती परंतु लोकप्रियता आणि जास्त मागणीमुळे ती आता आठवड्यातून तीनदा धावते. परंतु या किसान रेल्वेला लासलगांव, जि. नाशिक येथे थांबा दिला नाही. लासलगांव येथे आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. नाशिक जिल्हा व लगतच्या परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल लासलगांव मार्केट यार्ड येथे विपणन व साठवणीसाठी आणतात. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्याची नितांत आवश्यकता असून लवकरात लवकर किसान रेल्वेला लासलगांव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी मंत्री श्री. भुजबळ यांनी रेल्वे मंत्री श्री. गोयल यांच्याकडे केलेली आहे.

थोडे नवीन जरा जुने