जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा

 यवतमाळ, दि. 18 : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियेाजन सभागृहात कोविड-१९ तसेच ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या विषयांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्स डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण अचानक का वाढले अशी विचारणा करून विभागीय आयुक्त म्हणाले, ज्या ठिकाणावरून जास्त पॉझेटिव्ह रुग्ण येत आहे, अशा शहरी व ग्रामीण भागात अत्यंत काटेकोरपणे सर्व्हेलंस वाढविणे गरजेचे आहे. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्युवर चांगल्या प्रमाणात नियंत्रण आणले. त्याच धर्तीवर येथे सुध्दा डॉक्टरांनी प्रयत्न करावे. यासाठी राज्याच्या टास्क फोर्सशी नियमित संपर्कात राहावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी अकोला जीएमसीच्या डॉक्टरांसोबत चर्चा करावी.

जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांमागे त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क कॉटॅक्ट शोधण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी व्यक्त केली. संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे हे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात 17 टक्क्यांपर्यंत गेले होते. आता मात्र 9.42 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घ्या. पॉझेटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागात सभोवतालची त्रिज्या ठरवून तो भाग प्रतिबंधित करून नागरिकांची तपासणी करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या किती. अतिरिक्त बेडबाबत काय नियोजन केले आहे. एका रुग्णाला 24 तासात किती ऑक्सीजन लागते. ऑक्सिजन सिलींडरचा पुरवठा नियमित होतो का. औषधांचा तुटवडा आहे काय, आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच वाढीव कोव्हीड बेडसाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी उपलब्ध करून घ्या. सफाई कर्मचा-यांबाबत एखादी एजन्सी अधिग्रहीत करण्याचे नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत जनजागृतीपर पोस्टर्स व इतर साहित्याचे विमोचन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे सदस्य, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने