माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर जनसामान्यांतील लोकप्रिय नेता – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

 मुंबई, दि. 7 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संयमी अभ्यासक, जनसामान्यांतील लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख होती, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी मुख्यमंत्री  शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे महाराष्ट्राच्या विकासात येागदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने हे नेतृत्व आपण कायमचे गमावले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी योगदान दिले. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी आग्रही असणाऱ्या पाटील-निलंगेकर यांनी मुख्यमंत्री म्हणून तडफेने काम केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ते जुन्या काळातील उच्च विद्याविभूषित होते. हैद्राबाद मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या पाटील-निलंगेकर यांनी आपले जीवन जनसामान्यांसाठी वाहिले. लातूरमध्ये शिक्षणसंस्थेची स्थापना करुन शिक्षणगंगा या भागात आणली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे जीवन संघर्षमय होते. शेतीपासून आरोग्य क्रांती असा प्रवास करताना त्यांनी लोकन्यायालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामतही आपले योगदान दिले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, अनेक प्रश्नांविषयी आग्रहाने आपली भूमिका मांडणारे शिवाजीराव हे जनसामान्यांत वावरणारे नेते होते. प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर देणे, निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची पध्दत वाखाणण्यासारखी होती.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे एक उत्तम अभ्यासू, कुशल संघटक आणि लोकप्रिय नेते होते. महाराट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी निलंगेकर यांनी मोठे योगदान दिले. मितभाषी, शांत, सुस्वभावी आणि संयमी असा त्यांचा स्वभाव होता.मराठवाडा विकासासाठी 42 कलमी, विदर्भ विकासासाठी 33 कलमी तर कोकण विकासासाठी 40 कलमी कार्यक्रम त्यांनी सर्वप्रथम राबविला. महसूल, जलसंपदा, आरोग्य, पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महत्वपूर्ण आहे.

थोडे नवीन जरा जुने