मुंबई दि. २८: उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये माणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. महिंद्रा कंपनीचे माणगांव येथील युनिट बंद झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात कौटुंबिक गैरसोय होऊ नये, यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने विचार करावा. शिवाय त्यांच्या वयाप्रमाणे व अनुभवाप्रमाणे माणगांव व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या युनिटमध्ये पुढे सेवेत घेण्यात यावे, असेही कु. तटकरे यांनी सांगितले. राज्यात उद्योगाला प्रोत्साहन देतांनाच अशाप्रसंगी कामगारांना न्याय मिळावा यासाठी कंपनीने जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना भविष्यात नव्याने कंपनी सुरू झाल्यास प्राधान्य द्यावे असेही राज्यमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या मोबदल्याबाबत कंपनीकडून सहानुभूतीपूर्वक फेरविचार व्हावा, असे मत यावेळी मांडले. या बैठकीला स्थानिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिंद्रा कंपनीचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

 मुंबई, दि. 29 :  राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत या दूध भुकटीचे वाटप होणार आहे.



लॉकडाऊन काळात राज्यातील दूधभुकटीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या अतिरिक्त दूध भुकटीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महानंद मार्फत उत्पादित होणारी ही अतिरिक्त दूध भुकटीचा वापर आदिवासी भागातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बालकांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघांने (महानंद) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे. दूध भुकटीचे वितरण करण्याची ठिकाणे कळविण्यासंदर्भात महानंदने आदिवासी विकास विभागास कळविले आहे.

राज्यातील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील 1 लाख 21 हजार स्तनदा माता व  गरोदर महिलांना प्रति दिन 25 ग्रॅम आणि 6 लाख 51 हजार बालकांना प्रति दिन 18 ग्रॅम दूध भुकटीचे  वितरण अमृत आहार योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक वर्षासाठी सुमारे 5750 मेट्रिक टन दूध भुकटी लागणार आहे. ही संपूर्ण योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत (महानंद) एक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.

थोडे नवीन जरा जुने