उद्धव ठाकरे यांच्या नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील फोनवर धमकी ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेला 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची काल धमकी आली होती, या पाठोपाठ आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील फोनवर धमकी आल्याची माहिती मिळत आहे. 

याबाबतचे वृत्त असे की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे खाजगी निवास्थान असणारा वांद्रे येथील मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी कुविख्यात गँगस्टार दाऊदच्या हस्तकांनी दुबईहून फोनद्वारे दिली होती.या घटनेपाठोपाठच आज काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही फोनद्वारे धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. 

यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन माहिती दिली. परंतु या चर्चेचा तपशील मिळाला नाही. महाविकास आघाडीच्या बडया नेत्यांना अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याने आघाडीतील चिंताही वाढली आहे.


या विषयी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांना धमकी ही गंभीर बाब असून समाजविघातक प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्रिमंडळात याविषयी चर्चा होऊन निषेध व्यक्त केला आहे. 

या पाठीमागे कर्ता करविता कोण आहे ? याचा शोध घेण्यात येईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या धमकी प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे त्यातून या धमक्या कोण देत आहे हे बाहेर येईल. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, या प्रकरणाची क्राईम बँच कडून सखोल चौकशी करण्यात येईल.

थोडे नवीन जरा जुने