माझे कुटुंब माझी जबाबदारी : तालुकास्तरावर सर्वेक्षण मोहिमेचा शुभांरभ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.17:   ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  नंदुरबार तालुकास्तरीय मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात  संपन्न झाला.यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, उपसभापती लताबेन पाटील, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका वैद्यकीय अधिकारी जे.आर.तडवी उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावीत यांच्या हस्ते मोहिमेच्या टी-शर्ट व प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्रीमती पंत म्हणाल्या, ही मोहिम तालुकास्तरावर प्रभावीपणे राबवावी. वस्ती, वाड्या, तांडा अशा सर्व भागात जाऊन प्रत्येक घरात सर्वेक्षण करा व पहिला टप्पा 15 दिवसात पूर्ण करा. या सर्वेक्षणामुळे कोरोना नियंत्रणाच्या कामाला चांगली दिशा मिळेल. सर्वेक्षणात तापासारखी लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयाकडे संदर्भित करावे व अधिकाधिक नागरिकांना स्वॅब देण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यानी केले.

 

शहरातील सर्वेक्षणाचा शुभांरभ 

नंदुरबार शहरातील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा श्रीमती रत्नाताई रघुवंशी यांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी श्रीमती रघुवंशी यांनी कोरोना नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी आरोग्य पथकाला माहिती द्यावी असे आवाहन केले. कोरोनाला पराभूत करेपर्यंत नगरपालिकेतर्फे आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

तहसिलदार थोरात म्हणाले, कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी शासनाने ही मोहिम सुरु केली आहे. मोहिमेत नगरसेवकाचा सहभाग महत्वाचा असून प्रत्येक नगरसेवकाने वार्डनिहाय एक पुरुष व एक महिला स्वयंसेवकाची निवड करावी. कोरोनाबाबत आवश्यक माहिती घरोघरी पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधीनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने