मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अमित देशमुख

 लातूर,दि.१७ (जिमाका):- मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येत नसल्याने भारत सरकारने पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त केला व या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले.




 या लढ्यात ज्या थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले त्या थोर हुतात्म्यांना अभिवादन करून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढा उभा करून मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व शहिदांना अभिवादन करून आपण सर्वजण आजच्या या शुभदिनी विकासासाठी एकत्रित आले पाहिजे. राज्य शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आपला covid-19 विरोध चा लढा संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने covid-19 संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी महाराष्ट्र राज्य कोविड -19 मधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्याच्या प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोवीड मुक्त राज्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. लातूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ झालेला असून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा, पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने