कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा!

 धुळे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे प्रशासकीय व वैद्यकीय विश्लेषण करावे. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

आयुक्त श्री. गमे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या डॉ. ममता पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, ‘कोविड’चे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोविंद दाणेज यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, की कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय विश्लेषण करताना सर्व कारणांची मीमांसा करावी. त्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कन्टेन्मेन्ट झोनची परिणामकारक अंमबलजावणी करताना या भागातून नवीन रुग्ण येणार नाहीत, अशी दक्षता घ्यावी. गृह अलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या हालचाली टिपण्यासाठी संबंधितांना ‘महा कवच’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या हालचाली टिपणे शक्य होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. त्यासाठी पोलिस दलाची मदत घ्यावी. याशिवाय नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास प्रवृत्त करावे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून तपासणी करावी. चाचण्यांचे अहवाल तत्काळ मिळावेत म्हणून प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी. कोरोना विषाणूबाधित व्यक्ती तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सर्वेक्षणासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, असेही आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 209 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी नऊ हजार 704 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचारासाठी 670 ऑक्सिजनयुक्त बेड, अतिदक्षता विभागात 278 बेड, 99 व्हेन्टिलेटर व पाच हजार 731 सर्वसाधारण बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी टँक कार्यान्वित करण्यात येणार आहे. सध्या एक हजार 170 रुग्ण औषधोपचार घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महसूल वाढीसाठी प्रयत्न करावेत : आयुक्त

‘कोविड 19’ नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महसूल वाढविणे आवश्यक आहे. महसूल वाढीसाठी वेगवेगळे स्त्रोत निश्चित करून 100 टक्के वसुलीसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश आयुक्त श्री. गमे यांनी दिले. कोरोना विषाणूचा आढावा घेतल्यानंतर ते महसूल विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी सांगितले, मतदार यादीत 100 टक्के मतदारांची छायाचित्रे असावीत. त्यासाठी व्यापक मोहीम राबवावी. घरकूल योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. अंत्योदय योजनेचे उद्दिष्ट साध्य करावे. अन्नधान्य वितरणसाठी पॉस मशीनचा वापर करावा. महाराजस्व अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करवी.

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची भेट घेवून त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी अधिकाऱ्यांनी समजून घ्यावी. राज्य शासनाच्या योजनांसाठी ही कुटुंबे पात्र ठरत असतील, तर त्यांना तत्काळ या योजनांचा लाभ मिळवून

देत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन आयुक्त श्री. गमे यांनी केले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, फेरफार नोंदी, गावनकाशानुसार शेतरस्ते मोकळे करणे, मनरेगा, ई- महाभूमी, शिवभोजन योजना,  गौण खनिजाचा लिलाव व वसुली, अर्धन्यायिक प्रकरणांची ऑनलाइन सुनावणी, शिवार फेरी, भूसंपादन, पुनवर्सन आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. यादव, अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, उपजिल्हाधिकारी श्री. भामरे, श्री. दाणेज, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी आपापल्या विभागांमार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

जिल्हा रुग्णालयातील ‘कोविड’ कक्षाला भेट

आयुक्त श्री. गमे यांनी आज दुपारी जिल्हा रुग्णालयात कार्यरत डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरला भेट देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, उपविभागीय अधिकारी श्री. दराडे, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सांगळे, नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, तहसीलदार किशोर कदम, डॉ. अश्विनी भामरे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रुग्णांवर औषधोपचार करावेत. रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, असेही त्यांनी निर्देश दिले. डॉ. सांगळे, डॉ. पाटील, डॉ. भामरे यांनी रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती दिली.


थोडे नवीन जरा जुने