जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे – पालकमंत्री संजय राठोड

 यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात गत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर असून आजच्या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे,  बांधकाम सभापती राम देवसरकर, समाजकल्याण सभापती विजय राठोड, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या‍ हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दुपारी चर्चा करण्यात आली. प्रशासन व आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा आपला प्रयत्न आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन शिष्टमंडळाला केल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, संपूर्ण यंत्रणा तसेच ग्रामपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या अथक प्रयत्नामुळेच सुरवातीला यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यु नव्हता. सर्वांच्या प्रयत्नाने जिल्हा नियंत्रणात होता. आताही इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच आहे. याचे संपूर्ण श्रेय येथील सर्व यंत्रणांना जाते. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही जनमोहीम करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट असावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी यापुढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यासाठीसुध्दा नियोजन करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील परिस्थतीबाबत मुख्यमंत्री यांना अवगत करण्यात आले असून विभागीय आयुक्तांनीसुध्दा डॉक्टरांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे.

संपूर्ण यंत्रणा युध्दजन्य परिस्थतीसारखी कोरोनाचा सामना करीत असून त्यासाठी काही मतभेद झाले असतील तर ते नक्कीच सोडविण्यास येतील. मात्र नागरिकांचा विचार करून डॉक्टरांनी आपली सेवा बजावावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच येत्या काही दिवसात रेमडिसिवर इंजेक्शन जिल्ह्यात शासकीय दरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय दरात ते उपलब्ध होण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने