रायगड जिल्ह्यातील प्रगतीपथावरील लघु पाटबंधारे योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

 मुंबई, दि.६ : रायगड जिल्ह्यातील प्रगतीपथावरील लघु पाटबंधारे योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

 


रायगड जिल्ह्यातील विविध लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या कामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, मुख्य अभियंता सुनील कुशिरे, व्यवस्थापकीय संचालक वि.क.नाथ, अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर आणि हरिभाऊ गिते उपस्थित होते.

 

जलसंधारणमंत्री श्री.गडाख म्हणाले, जलसंधारण विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते प्रकल्प अधिक गतीने पूर्ण व दर्जेदार करावे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

 

या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या विविध मंजुरी तातडीने मिळवाव्या. याकरिता निधी वेळेवर देण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी तांबडी, घोटवळ, बारपे, नागलोली, लिपणीवावे, घोणसे, वांदेली, किन्हेश्वरवाडी, लोहारखोंडा, कोतवाल, जांबरुंग, या लघु पाटबंधारे तर काकल, डोंगरोली, कोंढवी, झिराड,  किंजळोली या साठवण तलावांच्या कामांना गती देण्याविषयीची मागणी केली.

 

खेडदापोली व मंडणगड विधानसभा क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य देणार

 

खेड, दापोली व मंडणगड विधानसभा क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य देत प्रगतीपथावरील व प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे श्री. गडाख यांनी सांगितले. माजी मंत्री श्री. रामदास कदम यांनी खेड, दापोली व मंडणगड विधानसभा क्षेत्रातील जलसंधारण अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळण्याकरिता मंत्री गडाख यांच्याकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात आढावा घेताना त्यांनी सांगितले. यावेळी आमदार योगेश कदम उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने